प्रवाह

 

या प्रवाहात जागोजाग भोवरे आहेत. अभिमानाचे, संस्कारांचे, परंपरेचे, नीतीचे, भक्तीचे, धर्माचे..

नाव-आडनाव-आईवडील-कुटुंब-घराणं-भाषा-देश-खंड-रंग आणि यांचा इतिहास याचा अभिमान पाहिजे. उद्या वेगळ्या ग्रहावर मनुष्यसदृश जमात सापडली तर पृथ्वीचा अभिमान,

आईवडिलांनी, घराण्यांनी, मातृभाषेने, मायभूमीने दिलेले संस्कार नाकारायचे नाहीत,

कुटुंब तोडायची नाहीत,

परंपरा मोडायच्या नाहीत..

असे हे सगळे भोवरे.

अशा भोवऱ्यांत अडकलेल्या माणसांना वाटतं ते प्रवाहात आहेत. पण तो त्यांचा भ्रम असतो. आभासाला प्रवास समजतो आपण.

भोवऱ्यात आपला वेळ जातो, भोवऱ्यात आपल्याला सुरक्षित वाटतं, भोवऱ्यात झुंडच्या झुंड आपल्या सोबत असते...

माझ्या जगातल्या माणसांनी, संस्थांनी, कलांनी या सगळ्या भोवऱ्यांशी माझी रीतसर ओळख सतत करून दिलेली आहे. हे भोवरे सुरक्षितता देतात. आपल्या जिवंतपणामध्ये असलेल्या वेळेच्या पोकळीला भरण्याचं काम करतात. कधी अभिमानानं आपला ऊर भरून येतो, कधी अपमानाने आपण पेटून उठतो, कधी आपण जुनं जपायला जीव ओततो,  कधी कुटुंब अबाधित राखण्यासाठी आपण अगतिकता, लाचारी पत्करतो, लग्नसंस्थेला प्रेम समजतो, कर्तव्याच्या नावाखाली स्वत:चं मन मारत राहतो.. असेच कधीतरी प्रश्न पडायचे बंद होतात आणि भोवऱ्यामध्ये आपण स्थायिक होतो.

या सगळ्यात अडकून आपला प्रवास थांबतोय. स्वतःला शोधण्याचा... उत्क्रांतीचा... हे भोवऱ्यात अडकणं संपायला हवं...  

या सगळ्या सगळ्या प्रस्थापित भोवऱ्यांना आव्हान द्यायला पाहिजे, नवी मांडणी करायला पाहिजे.. जिथे अभिमान, परंपरा, मान अपमान असे शब्द नसतील, प्रेमाला सीमा नसतील, भावनेला किंमत असेल, माणसांची बुद्धी जिथे विशाल असेल, जिथे कोणी उपाशी राहणार नाही आणि कोणी पोट जड होईपर्यंत खाणार नाही, जिथे साठेबाजी नसेल, प्रतिष्ठा- वंश-धर्म-भाग्य अशा संकल्पना जिथे अस्तित्वात नसतील.. जिथे तंत्रज्ञान कुरघोडीसाठी नाही तर माणसाच्या सहाय्यासाठी, सुसह्यतेसाठी वापरलं जाईल... जिथे खरा खरा इतिहास सांगितला जाईल आणि स्वीकारला जाईल, जिथे सत्याला सुंदर म्हणलं जाईल आणि जिथे माणसाची स्वीकारार्हता निसर्गासारखी विशाल असेल... अशी काहीतरी नवी मांडणी आपण करायला हवी.

‘प्रस्थापित लोप पावावं’ हे मला पटलेलं आहे हे खरंय. पण मला ठोस पर्याय सापडलाय असं मी म्हणणार नाही. मी भोवऱ्यातून सुटू पाहतीय एवढं खरं. प्रवाहात उतरतीय एवढं खरं. इतकं (म्हणजे कितकं हेही मला माहित नाही) पोहत राहण्याची माझी क्षमता आहे का याची मला खात्री नाही. एकटेपणाची सवय अजून मला झालेली नाही. सुखाचे, समाधानाचे, सौदर्याचे, प्रेमाचे मला भोवऱ्यामध्ये चिकटलेले पाश पूर्ण तुटलेत असंही नाही.

या वाटेवर चालू पाहणारी मी पहिली आहे असंही नाही आणि शेवटची तर मुळीच नाही. या विचारधारेचा भोवरा न होऊ देता प्रवाह वाहत ठेवायचा आहे एवढच.