ऐकण्यासाठी वरील YouTube link वर क्लिक करा.
8 मार्च 2021
महिलेस अनावृत्त पत्र,
प्रिय सखी,
निद्रेत असशील तर जागृत
हो, जागी असशील तर धीट हो, अडकून पडली असशील तर मुक्त
हो.. लक्षात घे आपल्या भीतीएवढी मोठी असते भिंत... पंख घेऊन उडणाऱ्याला भिंतीचं
बंधन नसतं...
तुझ्यामागे बघ... खूप
मागे लांब खोल गर्तेत एकीचा पदर अजून अडकलाय... तुझ्या पुढे बघ... खूप पुढे एक पदर
धरण अडवून उभाय... वर बघ अंतराळात पदर सोडून सूट घालून तरंगतय कोणी...
आपण साऱ्याजणींनी एक व्हायला पाहिजे.. पुरुषांच्या विरोधात नाही.
बाईच्या बाजूनं.
तुझी आई, तुझी बॉस, तुझ्या घरची कामवाली, तुझी मैत्रीण, तुझी प्रोफेसर, तुझ्या बसची कंडक्टर, सेक्युरिटीवाली,
तुला चहा आणून देणारी, तू जिला चहा नेऊन देतेस ती, तुझी मैत्रीण, तुझी ऑफिसातली सहकारी, तुझी शेजारीण, तुझी सासू, तुझी आजी... तुला माहिती आहे..
सगळ्या सोशिक आहेत. तुला माहिती आहे सगळ्या झगडतायत.. स्वतःशी, जगाशी.
या मालिका, हे सिनेमे, या जाहिराती आपल्या साऱ्याजणींमध्ये स्पर्धा लावतात. रंगाची, रुपाची, आदर्श मुलगी-सून-बायको होण्याची. हे पुरुषसत्ताक
मानसिकतेतून आलेले जोक्स, गॉसिप आपल्याला एकमेकींवर जळायला
शिकवतात. लक्षात ठेव या सगळ्या क्लुप्त्या आहेत. आपल्याला गुंतवून ठेवण्याच्या. आपण
एक होण्याला घाबरते पुरुषसत्ता.
आपण माहेरच्यांची लाज
आणि सासरच्यांची शान असतो म्हणे. घराण्याची इज्जत असतो म्हणे. हे आपल्या विरुद्ध झालेलं सर्वात मोठं स्कँडल आहे
लक्षात घे.
गोरा रंग, गुळगुळीत त्वचा, फिगर, केस
यातच सौंदर्य असतं म्हणे. आणि बाईनं सुंदर आणि पुरुषानं कर्तबगार असावं म्हणे. ही
आपली केली गेलेली सर्वात मोठी फसवणूक आहे लक्षात घे.
बाईला मुळातच घरकामात गती
असते, तिच्यामध्ये मुळातच आईपण असतं, ती मुळातच सोशिक आणि
सहनशील असते म्हणे. ही आपल्या बाबतची सर्वात मोठी अंधश्रध्दा पसरवली गेलेली आहे
लक्षात घे.
तुझ्या
विषयी Prejudices नको असं वाटत असेल तर privileges
सोडून दे.
पैशानं, कष्टानं, धीरानं जबाबदारी घे, हक्कानं अधिकार बजाव—मिळाले
नाहीत तर झगडून मिळव.
आळस सोड. भाऊ बघेल, वडील बघून घेतील, नवरा सगळं सांभाळतो यातून बाहेर
ये. मी करते म्हण. मी बघते मी सांभाळते म्हण. बरोबरीने उभी राहा.
कौतुक सुद्धा पारखून
घे. तुझ्या दिसण्याचं, तुझ्या घरकामाचं, तुझ्या मुलगी
म्हणून- बायको म्हणून समजूतदार असण्याचं, आई म्हणून एकहाती मुलांना सांभाळण्याचंच
फक्त कौतुक होतंय का याकडे लक्ष ठेव. याहून वेगळे तुझे छंद,
तुझं करिअर, तुझी अचिव्हमेंट यांचं जाहीर कौतुक होतंय का तेही बघ. ‘घरचं सांभाळून
हवं ते कर’ ही सभ्य भाषेत दिली गेलेली धमकी आहे लक्षात घे. या शब्दात दडलेला खरा
अर्थ, ‘घर सांभाळून नोकरी करता येत नसेल तर ती सोडून दे, आम्हाला तुझ्या नोकरीची
गरज नाही’ असा आहे.
‘वेळ
जात नाही’ असं म्हणतेस तेव्हा वेळ वाया जात असतो लक्षात घे.
तुझी सौंदर्याची
व्याख्या तू बनव. तुझी आई बघ, मावशी बघ.. तुझ्या
शाळेतल्या बाई आठव.. रंगात, फिगरमध्ये,
कपड्यात ते नाही हे तुला एव्हाना कळायला हवं होतं. तुला कम्फर्टबल कपडे घाल, कुठेही कोणतेही कपडे घालून जा.. मोकळी हो.. आनंद शोध, हक्कानं रागव, मनातली प्रत्येक भावना ओळखून मोकळी कर.. बिनधास्त मोकळ्या मनाने
जग.. बघ सुंदर दिसशील.
रंग, भाषा, कपडे, फिगर तुला बाह्य सौंदर्य देतीलही
कदाचित. पण डोळ्यातला जीव तुझं तुला शोधावा लागेल. बघ एकदा आरशात डोळे निस्तेज होत
चाललेत का तुझे? ते full ऑफ life
व्हायला हवे असतील तर तुला जगावं लागेल. मनसोक्त जगावं लागेल.
वेळेत स्वयंपाक न
झाल्याचा, घरच्या पसाऱ्याचा, घरच्या प्रथा-परंपरा पाळल्या न गेल्याचा गिल्ट घेणं
बंद कर. घरातल्या सगळ्यांचा आनंद ही तुझी एकटीची जबाबदारी आहे हे जे बिंबवलं गेलंय
ना आपल्या मनावर ते खरडून काढ. Adjustment चा ठेका घेऊ नको. समजूतदार
व्हायचं म्हणजे सतत नमतं घ्यायचं असं नाही ना.
फक्त ‘असंच होत आलंय
कित्येक वर्षं’ म्हणून एखादी गोष्ट स्वीकारू नको, ‘हळूहळू
बदलतायत गोष्टी’ यावर विश्वास ठेऊ नको. गोष्टी आपोआप बदललेल्या नाहीयत. शेणामातीचे
हल्ले पचवण्यापासून—नग्न धिंड काढून घेण्यापासून ते जीव गमावण्यापर्यंत ..
सावित्री कालही लढत होती.. आजही लढत आहे. तुला लढता आलं नाही, रस्त्यावर उतरता आलं
नाही, तर किमान तिच्या लढ्याची जाण ठेव, आचरणात आणशील तेव्हा आणशील पण किमान तिच्या विचारांचा प्रचार कर, प्रसार कर.. तुझा पाठींबा जाहीर कर.
‘हिच्या मागे मुलगा
लागला’, ‘हिच्यावर बलात्कार झाला’ असं न म्हणता ‘हा मुलगा एका मुलीच्या मागे लागला’
, ‘याने एका मुलीवर बलात्कार केला’ असं म्हण. ‘सून सासू सासऱ्यांना बघत नाही’ असं
न म्हणता ‘मुलगा त्याच्या आईवडिलांना बघत नाही असं म्हण’. मुलीच्या आई वडिलांना सांभाळायला जावयानं नकार दिला तर आपण ‘जावई सासू
सासऱ्यांना बघत नाही’ असं म्हणतो का?
नेमकी सणाच्या दिवशी
पाळी आली याचा गिल्ट घेऊ नको, पोटात दुखून झोपून राहायला
लागलं आणि घरची -ऑफिसची कामं झाली नाहीत याचा गिल्ट घेऊ नको. मासिक पाळी हा तुझा
वौयक्तिक प्रश्न नाही तर अखंड मानव जातीची ती गरज आहे लक्षात घे.
सश्रद्ध असशील तर
देवीला बाईच्या हातची पूजा चालत नाही याला विरोध कर,
नास्तिक असशील तर आपल्या देवतांच्या- ऋषी मुनींच्या अनैतिक वागण्यावर बोट ठेव, प्रश्न विचार. स्त्रीला मोह ठरवणाऱ्या आणि पुरुषाला मोक्षाचा उपदेश
करणाऱ्या अध्यात्मावर टीका कर.
तुला घरची लक्ष्मी
म्हणून तुला बांधून ठेवतात, डोळे उघडून बघ. मूर्ती, कलश, कुंकू, मंगळसूत्र अशा प्रतीकांमध्ये अडकू नको.
प्रेम शोध, आदर शोध.
कोणी कृष्ण येणार नाही
तुझ्यासाठी. कृष्ण ही बाईच्या मनातली कविकल्पना आहे लक्षात घे.
प्रेमाची व्याख्या
तपासून बघ. एकदा प्रेम करून कायमची अडकू नको. पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमाच्या
कसोटीवर त्याला पारखून घे. तू सुद्धा पुन्हा पुन्हा प्रेमाची परीक्षा दे. एकदा
बरोबरीचं नातं निर्माण झालं आणि एकदा दोघांचाही स्थितीत न अडकता प्रवास सुरु
राहिला की परीक्षा परीक्षा राहत नाही. तेव्हा प्रेमात गणिताचं गाणं होताना तू
पाहशील लक्षात घे.
सुखाची व्याख्या तपासून
बघ. घर, गाडी, चांगल्या पगाराची नोकरी पुरते का बघून घे.
साथ, सोबत, आदर,
वेळ, किंमत, तुझ्या मताला जागा, तुझ्या स्वप्नांना वाटा,
तुझ्या समाधानाला अग्रक्रम मिळतो का बघून घे. समाजात मिरवायला एकवेळ ते पुरेल पण
जगायला गंमत येतीय का हे बघून घे.
नटणं, लाजणं, नखरे ही
तुझी identity आहे असं थोतांड अनेक वर्ष चालू आहे. ते झुगारून दे. गढून काम करताना, मन लावून पुस्तक वाचताना, मळकट कपड्यांनी स्वच्छता
करताना, घामेजून राबताना सुद्धा तू सुंदर दिसतेस, सेक्सी दिसतेस लक्षात घे. Decline to be sleeping beauty. तुला सरेंडर होण्याची
गरज नाही. Be natural. तू पुढाकार घेऊ शकतेस, तू
उग्र असू शकतेस, अग्रेसिव्ह असू शकतेस. आणि तेव्हाही सुंदर दिसतेस लक्षात
ठेव. तेव्हाही हवीहवीशी वाटतेस लक्षात ठेव.
बाळावर
संस्कार फक्त आई करत असते, ती तिची जबाबदारी आहे, मुलं
मोठी होईपर्यंत तिने त्यांच्यासाठी घरी हजर राहिलं पाहिजे हे सगळं धादांत खोटं
आहे. तुला घरी कोंडून घालण्यासाठी वापरलेला अंकुश. 9 महिने पोटात वाढवून जन्माला
घालण्याची आणि अंगावर दुध पाजावण्याची कृती
सोडून मुलांना वाढवण्याच्या कामात असं एकही काम नाही जे बाळाचा बाबा करू शकत नाही.
कामं वाटून घे.
लग्नासाठी
करिअर सक्रिफ़ाइज करू नको. दोघं वेगवेगळ्या ठिकाणी असाल तर ज्याला सहज शक्य आहे
त्याने दुसऱ्याच्या ठिकाणी काम शोधावं. बाई आणि पुरुष हा मुद्दा बाजूला ठेऊन
दोघांमध्ये understanding असावं. गरोदरपणात
शक्य तेवढ्या शेवटपर्यंत काम कर. मुल जन्माला आल्यानंतर शक्य तितक्या लवकर परत काम
सुरु कर. म्हणजे interview च्या वेळी विचारले जाणारे लग्नाचे आणि बाळाचे प्रश्न
बंद होतील. प्रमोशनच्या मधले अडथळे दूर होतील.
जात,
धर्म, देश सगळ्याच्या उच्च निचतेमध्ये बाईचा पहिला बळी जातो
लक्षात घे. एक हो. समजून घे. पुरुषसत्ताक बंधनं नाकारताना जातीची,
धर्माची, भाषेची, स्थानाची सगळी उच्च नीचता झुगारून दे. एक हो. समजून घे.
आवाज
उठवायला कुठलाही क्षण योग्यच असतो. स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ कधीही निघून जात
नाही. तुटलं तर तो तुझा दोष नाही. ते नातंचं तेवढं तकलादू होतं हा त्याचा
निष्कर्ष.
इज्जत,
अभिमान, लाज या भावनांना तिलांजली दिलेल्या बाईला पुरुषसत्ता
सगळ्यात जास्त घाबरते लक्षात ठेव. तू बोलायला लागलीस की मूळ प्रश्नाला उत्तर न
देता तुझ्या नैतिकतेला धरून वेगळेचं प्रश्न विचारले जातील. ‘मग तू यावर का नाही
बोलत’, ‘मग तू त्यावर का नाही बोलत. डगमगू नको. त्यांच्याकडे उत्तर नसलं की ते
प्रतिप्रश्न करतात. तू आदर्श नाहीस. असण्याची गरज नाही. आणि तरीही तू प्रश्न
विचारू शकतेस. चुकलीस तर मान्य कर. क्षमा माग. स्वत: बदलायला कचरू नको. कुठलंही मत
शेवटचं मत मानू नको. बदलायला तयार राहा. नवीन विचार स्वीकारायला तयार राहा. पण माणसाला
समानतेकडे नेणारा प्रवास थांबवू नको.
एकदा
ठरवलस की समानता मानायची की मग खरा प्रवास सुरु होईल. खोटं बोलणार नाही तुझ्याशी
पण प्रवास अवघड आहे. प्रचंड दमवणारा आहे. पण तेव्हाच खूप समाधान देणारा आहे.
आपल्या जिवंतपणी इच्छित स्थळी नाही पोचणार कदाचित आपण. पण तरीही हा प्रवास
आयुष्याचं सार्थक करणारा आहे.
- मृदगंधा