यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.....

 


'अभिमान' म्हणजे काय?

अभिमानामध्ये काय काय समाविष्ट होतं?

मला जे आयतं, माझ्या प्रयत्नांशिवाय लाभलं त्याचा मनापसून स्वीकार. म्हणजे माझे आई बाबा, नातेवाईक, घराणं, माझं नाव, आडनाव, जात, धर्म, गाव, भाषा, देश.  

मी जे कमावलं त्याची जाणीव. म्हणजे माझे निर्णय, कष्ट, सातत्य, सन्मार्ग, यश, माझ्यातल्या करुणा-प्रीती-क्षमा अशा मूळ तत्वांना ओळख देऊन त्यांचा जाणूनबुजून वाढवलेला पसारा, माझ्यातल्या animal instinct वर काम करत माझ्यातला मी घडवलेला माणूस.

बरं पुन्हा 'स्वीकारायचं' म्हणजे काय?

त्याची ओळख करून घ्यायची, माहिती घ्यायची, इतिहास समजून घ्यायचा, प्रत्येक गोष्टीचे कंगोरे-खोली-लांबी-रुंदी समजून घ्यायची. साहजिकच या प्रवासात चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी समजतील. काळानुरूप मूळ चांगल्या पण आता वाईट ठरणाऱ्या गोष्टी सापडतील. माझ्या नातेवाईकांच्या हातून गुन्हा झाला, माझ्या धर्मातल्या अमानवी गोष्टी मला समजल्या, माझ्या गावाच्या – देशाच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या. तरी जन्मानं मला मिळालेल्या गोष्टींचा अभिमान बाळगायचा, त्यांना स्वीकारायचं म्हणजे त्यांना defend करायचं? की खुल्या मनानं ते मान्य करून उपाय शोधायचा?

माझी बहिण व्यासनांध झाली तर तिचा मार्ग चुकतो आहे हे स्वीकारून तिला त्यातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करेन ना मी? आणि ते मार्ग दारू-सिगारेट विकणाऱ्या लोकांना दोष देत बसणारे नसतील तर माणूस म्हणून तिला व्यसनातून परावृत्त करणारे असतील. हाच न्याय माझी भाषा, जात, धर्म, गाव, देश यांच्या बाबतीत लागू होईल ना?

अभिमान बाळगायचा म्हणजे criticism ऐकायचं नाही असं तर नव्हे ना?

चुकीच्या, काळाआड गेलेल्या गोष्टीना defend करत रहायचं असं तर नव्हे ना?

उदाहरण म्हणून ... सीतेची सत्वपरीक्षा त्या काळात त्या समाजात योग्यही असेल. आज तिला आपण चूक म्हणलं पाहिजे, परशुरामानं वडिलांच्या सांगण्यावरून आईला मारून टाकणं तेव्हा पितृभक्ति असेल- आज आपण त्याला चूक म्हणलं पाहिजे.. अशा अनेक नव्या-जुन्या गोष्टींची यादी करता येईल. ज्या गोष्टी महत प्रयासानं माणूस म्हणून आपण बदललेल्या आहेत.. आपली उत्क्रांती थांबलेली नाही.

माझ्या भावानं एखाद्या स्त्रीला फसवलं तर भाऊ चुकला असं मी म्हणलं पाहिजे- भावावरचं आंधळं प्रेम सोडून मी त्या स्त्रीची बाजू घेतली पाहिजे, माझ्या धर्मातल्या उच्च-नीचता मानणाऱ्या-वाढवणाऱ्या गोष्टी त्यागून मी माझे जात-धर्म अपग्रेड केले पाहिजेत  ना? माझ्या आणि माझ्या गोष्टींच्या कमजोरी, मर्यादा मी मान्य केल्या पाहिजेत. आणि त्या दूर होण्यासाठी किमान माझ्या वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत राहायला पाहिजे. याला खऱ्या अर्थाने 'स्विकारणं' असं म्हणता येईल.

आणि यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.  

अहिंसा, पर्यावरणाचं संवर्धन, समता, स्वातंत्र्य, लोकशाही अशी काही तत्वं हजारो वर्षांच्या मानवी इतिहासातून आपण शिकलो आहोत. ही तत्वं पुन्हा पुन्हा सिद्ध झालेली आहेत. अभिमानाची चुकीची व्याख्या आपल्या माणूस म्हणून कमावलेल्या शहाणपणाच्या आड येता कामा नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा