गारगोटी मग कोल्हापूर. मग पुण्यातून LL’B केलं. सध्या मुंबईच्या गर्दीत शोधाशोध चालू आहे... वकिलीमध्ये रमले नाही. रानडेच्या कट्ट्यावर सिगारेटच्या धुरात पत्रकारितेच्या गप्पा ऐकल्या. साधना साप्ताहिक मध्ये काम करताना, रामचंद्र गुहांच्या लेखांचे अनुवाद करताना, रत्ना पाठक, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव या कलाकारांच्या मुलाखती, ‘वायर मराठी’साठी अनुवाद, लेख,, असं काहीबाही एका बाजूला सुरु असताना सतत वाटत असतं की याहून अधिक काहीतरी आपल्याकडे आहे सांगण्यासारखं. तसं तर सगळ्यांकडे काही ना काही असतंच सांगण्यासारखं. मला ते सांगता येतं एवढंच. म्हणूनच कदाचित ‘प्रतिलिपी’च्या लेखकांसाठी मेंटोरचं काम करता आलं. ‘मिळून साऱ्याजणी’ मध्ये माझी कथा आली तो विद्या बाळ यांचा संपादक म्हणून शेवटचा अंक ठरला. त्यामुळं तो अंक मी जपून ठेवला आहे. मराठी, मध्यमवर्गीय, मॉडर्न कुटुंब आहे माझं... माझ्या घरच्या गप्पिष्ट संस्कारात माझ्या लिखाणाचं मूळ असावं असं मला वाटतं.
