हा लेख मी फक्त स्त्रियांच्या वतीने लिहिलेला नाही.


याआधीचे स्त्री-पुरुष समानतेविषयीचे काही लिखाण वाचण्यासाठी या लिंक देत आहे. 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3167922473289262&id=100002146226513&scmts=scwspsdd&extid=V9K7YuIvF6dogDbq








स्त्री-पुरुष समानातेविषयी माझ्यासारखे लोक बोलतात तेव्हा काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात,

1.    स्त्री- पुरुष समानतेविषयी बोलताना सगळ्या स्त्रिया माझ्या बाजूच्या असतीलच असं नाही.

2.    स्त्री-पुरुष समानतेच्या थेट/वळणावळणाने विरोधात बोलणाऱ्या स्त्रिया स्वतः पुरुषसत्ताक पद्धतीच्या बळी आहेत. त्यामुळं त्यांच्याशी लढावं लागलं तरी लढताना दृष्टीकोन सहानुभूतीचा ठेवावा लागेल.

3.    तत्व म्हणून स्त्री-पुरुष समानता स्वीकारली म्हणजे लगेच उद्यापासून जग बदलेल असं होणार नाही. तो प्रवास दोघांनी मिळून करावा लागेल.

मुळात तत्व म्हणून स्त्री पुरुष समानता मानताना देखील लोक अटी घालतात. स्त्रीने सशक्त व्हायला पाहिजे म्हणे त्यासाठी. इथे दोन मुद्दे आहेत, पहिले म्हणजे प्रचंड वेदना सहन करून एका स्त्रीनेच तुम्हाला जन्माला घातलेलं आहे. त्यामुळे शारीरिक दृष्ट्या तर ती सशक्त आहेच. बाकी राहिला प्रश्न शिक्षण, नोकरी याचा. स्त्रीनेच काय प्रत्येकाने शिक्षण घ्यावं आणि आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहावं हेच योग्य आहे- मग ती स्त्री, पुरुष कोणी असो. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की आत्ताचे पुरुष वर्चस्व पुरुषाच्या सशक्त असणाऱ्यावर अवलंबून नाही. भित्रा, कमी शिकलेला, न कमावणारा असा एखादा मुलगा आईवर, बायकोवर सत्ता गाजवताना तुम्ही आजूबाजूला पाहिलेला नाही? घरची आर्थिक जबाबदारी घेतात म्हणून सत्ता गाजवतात म्हणावं तर बायकोपेक्षा खूप कमी पैसे मिळवणारे आणि तरी बायकोशी माजात वागणारे कितीतरी नवरे मला माहिती आहेत.

"आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धती आहे. स्त्री-पुरुष समानता येणं आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रीला झगडावं लागणार आहे. आणि या सगळ्या प्रवासात मी स्त्री असो की पुरुष असो एक माणूस म्हणून मी समानतेच्या बाजूने आहे" हे आपण सतत घोकलं पाहिजे.

एक स्त्री म्हणून विचार केला तर अनेक आघाड्यावर लढावं लागणार आहे,

1.    स्वतःच्या looks, appearance, dressing याला आपल्या अस्तित्वाचा निकष न होऊ देणे.

2.    आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहणे.

3.    घरी, कॉलेजात, ऑफिसमध्ये, संसारात पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, आणि महत्वाचं म्हणजे जबाबदारी घेणे.

4.    कष्टाची कामे पुरुषाने करावीत अशी अपेक्षा न करता स्वतःला कष्टाच्या कामांसाठी तयार करणे.

5.    मुलाने प्रपोज केलं पाहिजे, त्यानंच गिफ्ट दिलं पाहिजेत, मुलानंच ड्रायव्हिंग केलं पाहिजे, त्यानंच खर्च केला पाहिजे असे समज डोक्यातून काढून टाकणे.

6.    स्वतःच्या शिक्षणाचा, करिअरचा, कपडे-दागिने, शाकाहारी-मांसाहारी खाण्याचा  निर्णय स्वत: स्वतःसाठी ठामपणे घेतला पाहिजे.

7.    भाऊ, नवरा दोघांच्या बरोबरीने दोन्ही घरी आर्थिक व्यवहारात, सर्व प्रकारच्या निर्णयात आणि जबाबदारीत बरोबरीने सहभागी झालं पाहिजे.

8.    अंधश्रध्दाना बळी नाही पडलं पाहिजे.

9.    सतत स्वतःला प्रश्न विचारत, माणूस म्हणून स्वतःवर काम करत राहिलं पाहिजे. बदलांना स्वीकारलं पाहिजे नव्हे प्रसंगी बदल घडवले पाहिजेत.  

10.बरोबरीचा अधिकार उपभोगताना बरोबरीने जबाबदारी घेतली पाहिजे.

थोडक्यात काय तर स्त्री म्हणून आपल्याविषयी prejudices नकोत असं वाटत असेल तर previleges सोडावी लागतील.

उगाच लग्नात प्रोब्लेम येईल, उगाच घरचे दुखावतील, सणा-वाराला तमाशा नको, एवढीशी तर गोष्ट आहे, तो कमावतोय ना भरपूर, काही कमी पडत नाहीय ना, बाकी मुलींचे नवरे-सासरचे लोक किती छळतात त्यांना, त्यापेक्षा आपलं बरं आहे ना, मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला ही वाक्य कायमसाठी मराठी भाषेतून काढून टाकली पाहिजेत.

अस विचार करणाऱ्या स्त्रियांना मला सांगावसं वाटतं,

बाई गं तुझ्या लग्नात alrady प्रोब्लेम आहे. फक्त तू denial mode ला गेली आहेस इतकंच.

घरचे दुखावतील म्हणून तू शांत राहतेस. पण दुखावली जात आहेसच ना. आणि तू समजुतीने घेतेस म्हणून ते तुझं कौतुक करतायत का? आणि त्यांच्या मनासारखं वागून देखील हसऱ्या चेहऱ्याने वावरतायत का? माझ्या आईच्या भाषेत कितीही बाबापुता केलं तरी यांची तोंडं हगायला गेलेली. मग कशाला त्यांच्या दुखण्याचा एवढा विचार करतीयस?

सणा वाराला तमाशा नको असं त्यांना पण वाटत असेल तर तू बोललीस की तुझ्या मनासारखं करून गप बसतील ते. सणवार चांगले जाणं ही तुझ्या एकटीची जबाबदारी आहे का? आणि असेल तर का याचा कधी विचार केला आहेस?

एवढीशी गोष्ट आहे. असं तू म्हणतेस. तुझी एवढीशी गोष्ट तितक्याच समजुतीने ते सोडून देतात?

तिच्यापेक्षा माझं बरं. मग तू काय आता तुझ्यावर हात उचलायची वाट बघती आहेस काय? फक्त 'मारहाणीलाच' छळ म्हणता येता का?

मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय. या वाक्याचा तर अर्थच मला कळलेला नाही. ते तुला बरोबरीने वागवत नाहीत इथेच त्यांनी त्यांच्यात आणि तुझ्यात फरक केलेला आहे. आता वेगळ्यानं तुला फरक दाखवत बसायची काय गरज आहे?

पुरुषसत्ताक संस्कृतीत वाढलेल्या पुरुषासाठी देखील अशा समानतेने जगणाऱ्या स्त्री सोबत वावरणं थोडं अवघड जाणं स्वाभाविक आहे. पण 'समानता हवी' हे तत्वं म्हणून एकदा पुरुषांनी स्वीकारलं की तेव्हाचं साहचर्य आत्तापेक्षा कितीतरी प्रगल्भ असेल अशी मला खात्री वाटते. एका दिवसात अमुलाग्र बदल होणार नाही, हे तर आहेच. फक्त तो अपोआप होणार नाही. तो आपल्या आपल्या कुवतीप्रमाणं आपल्याला घडवावा लागेल.  

डॉ दाभोलकर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या बाबतीत म्हणायचे तेच तत्व आपण वळवून स्त्री-पुरुष समानतेसाठी उपयोगात आणलं तर?

पहिली पायरी म्हणजे स्त्री-पुरुष समानता हा विचार म्हणून स्वीकारणं.

दुसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा प्रचार करणं.

आणि तिसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानता आचरणात आणणं.

यात सगळे मुद्दे आले असतील असं नाही. त्यामुळे वाचणाऱ्यांनी नक्की त्यांचे इनपुट्स द्यावेत. फक्त चुका काढण्यासाठी जेव्हा अशा लिखाणावर लोक बोट ठेवतात तेव्हा नाराज व्हायला होतं. स्त्री-पुरुष समानता तुम्ही मान्य करत असाल तर तुमचा टोन positive असावा असं मला वाटतं. विचारात, आचारात काय सुधारणा करायची ती आपण करू, चर्चा करू. पण आपण एका बाजूचं असावं आणि आपलं ध्येय समानता असावं एवढं मला वाटतं. उगाच ओळखीच्या एखाद्या स्त्रीचं उदाहरण देऊन गोष्टी जनरलाईज करू नयेत.

हा लेख मी फक्त स्त्रियांच्या वतीने लिहिलेला नाही. स्त्री-पुरुष समानता मानणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांच्या बाजूने पुरुषसत्ताक पद्धतीला टिकवणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या विरोधात लिहिलेला आहे. वाचणाऱ्या व्यक्तीने ठरवावं की ती कोणत्या बाजूची आहे.


यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.....

 


'अभिमान' म्हणजे काय?

अभिमानामध्ये काय काय समाविष्ट होतं?

मला जे आयतं, माझ्या प्रयत्नांशिवाय लाभलं त्याचा मनापसून स्वीकार. म्हणजे माझे आई बाबा, नातेवाईक, घराणं, माझं नाव, आडनाव, जात, धर्म, गाव, भाषा, देश.  

मी जे कमावलं त्याची जाणीव. म्हणजे माझे निर्णय, कष्ट, सातत्य, सन्मार्ग, यश, माझ्यातल्या करुणा-प्रीती-क्षमा अशा मूळ तत्वांना ओळख देऊन त्यांचा जाणूनबुजून वाढवलेला पसारा, माझ्यातल्या animal instinct वर काम करत माझ्यातला मी घडवलेला माणूस.

बरं पुन्हा 'स्वीकारायचं' म्हणजे काय?

त्याची ओळख करून घ्यायची, माहिती घ्यायची, इतिहास समजून घ्यायचा, प्रत्येक गोष्टीचे कंगोरे-खोली-लांबी-रुंदी समजून घ्यायची. साहजिकच या प्रवासात चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी समजतील. काळानुरूप मूळ चांगल्या पण आता वाईट ठरणाऱ्या गोष्टी सापडतील. माझ्या नातेवाईकांच्या हातून गुन्हा झाला, माझ्या धर्मातल्या अमानवी गोष्टी मला समजल्या, माझ्या गावाच्या – देशाच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या. तरी जन्मानं मला मिळालेल्या गोष्टींचा अभिमान बाळगायचा, त्यांना स्वीकारायचं म्हणजे त्यांना defend करायचं? की खुल्या मनानं ते मान्य करून उपाय शोधायचा?

माझी बहिण व्यासनांध झाली तर तिचा मार्ग चुकतो आहे हे स्वीकारून तिला त्यातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करेन ना मी? आणि ते मार्ग दारू-सिगारेट विकणाऱ्या लोकांना दोष देत बसणारे नसतील तर माणूस म्हणून तिला व्यसनातून परावृत्त करणारे असतील. हाच न्याय माझी भाषा, जात, धर्म, गाव, देश यांच्या बाबतीत लागू होईल ना?

अभिमान बाळगायचा म्हणजे criticism ऐकायचं नाही असं तर नव्हे ना?

चुकीच्या, काळाआड गेलेल्या गोष्टीना defend करत रहायचं असं तर नव्हे ना?

उदाहरण म्हणून ... सीतेची सत्वपरीक्षा त्या काळात त्या समाजात योग्यही असेल. आज तिला आपण चूक म्हणलं पाहिजे, परशुरामानं वडिलांच्या सांगण्यावरून आईला मारून टाकणं तेव्हा पितृभक्ति असेल- आज आपण त्याला चूक म्हणलं पाहिजे.. अशा अनेक नव्या-जुन्या गोष्टींची यादी करता येईल. ज्या गोष्टी महत प्रयासानं माणूस म्हणून आपण बदललेल्या आहेत.. आपली उत्क्रांती थांबलेली नाही.

माझ्या भावानं एखाद्या स्त्रीला फसवलं तर भाऊ चुकला असं मी म्हणलं पाहिजे- भावावरचं आंधळं प्रेम सोडून मी त्या स्त्रीची बाजू घेतली पाहिजे, माझ्या धर्मातल्या उच्च-नीचता मानणाऱ्या-वाढवणाऱ्या गोष्टी त्यागून मी माझे जात-धर्म अपग्रेड केले पाहिजेत  ना? माझ्या आणि माझ्या गोष्टींच्या कमजोरी, मर्यादा मी मान्य केल्या पाहिजेत. आणि त्या दूर होण्यासाठी किमान माझ्या वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत राहायला पाहिजे. याला खऱ्या अर्थाने 'स्विकारणं' असं म्हणता येईल.

आणि यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.  

अहिंसा, पर्यावरणाचं संवर्धन, समता, स्वातंत्र्य, लोकशाही अशी काही तत्वं हजारो वर्षांच्या मानवी इतिहासातून आपण शिकलो आहोत. ही तत्वं पुन्हा पुन्हा सिद्ध झालेली आहेत. अभिमानाची चुकीची व्याख्या आपल्या माणूस म्हणून कमावलेल्या शहाणपणाच्या आड येता कामा नये.

नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..


 

प्रेमावर आपण भरपूर बोलतो, भरपूर लिहितो. पण सॉक्रेटीसच्या खोडीप्रमाणं प्रेमाची व्याख्या करायला जात नाही.

एखाद्या माणसाचा सहवास हवासा वाटणं म्हणजे प्रेम?

एखादा माणूस पटणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसावर हक्क वाटण्याइतपत तारा जुळणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसाच्या आपलं असण्यानं सुरक्षित वाटणं म्हणजे प्रेम?

मानसिक, शारीरिक, सामाजिक संकोच ज्या माणसासमोर राहत नाही ते प्रेम?

सामाजिक अनुरूपता म्हणजे प्रेम?

की वैचारिक भारलेपण म्हणजे प्रेम?

शारिरीक आकर्षण हे प्रेमाचं श्रेय असतं का खरंच?

एखाद्याकडून शून्य अपेक्षा आणि लाखभर सदिच्छा म्हणजे प्रेम?

की न ठरवता, न मोजता, विश्लेषण न करता ऋतूत झाड मोहरून यावं तसं दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात मिसळून जाणं म्हणजे प्रेम?

वेळ, वय, ऊन- पाऊस, माती, बीज... कुणाचं श्रेय नाही यात?

एखादा माणूस उलगडत जाईल तसा पटत जायला हवा.

'सोबत' घडणं आणि 'सोबत' निभावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.  

प्रवाह मिसळतात आणि रेल्वेचे रूळ? एकत्र पण, समांतर....

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

बस् एवढी एकच अट आहे, की, सहवास घडावा..निभावावा लागू नये.

नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..

आपलं अद्वैत असावं- समांतर चालावं लागू नये..

बस् एवढी एकच अट आहे...की,

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

 

 

परवडत नसेल तर तसं मान्य करा नाहीतर धंदा गुंडाळून गप्प बसा..


 

यावर्षीच्या दिवाळी अंकांच्या जाहिराती बघून मला आठवण झाली. मागच्या वर्षी एका दिवाळी अंकाने माझ्याकडून कथा मागवून घेतली होती आणि दुसऱ्या एका दिवाळी अंकासाठी मी एक अनुवाद करून दिलेला होता. आजतागायत मला त्याचे पैसे मिळालेले नाहीत. पहिल्या सहा महिन्यामध्ये मी पाठपुरावा केला. त्यांनीही पैसे देण्याचं पुन्हा पुन्हा कबूल केलं. पण पैसे दिले नाहीत. दुसऱ्याच्या कष्टाचं खाऊन यांना झोप कशी लागते याचं मला आश्चर्य वाटतं.

पैशांचे वांदे झाले असतील तर तसं स्पष्ट सांगून त्यांनी हा दिवाळी अंकाचा उपद्व्याप बंद करायला हवा होता. पण असे अनेक फुकटे लोक दरवर्षी माझ्यासारखा नवीन बकरा शोधतात आणि आपले दिवाळी अंक भरतात. छापून येण्यात लेखनाची इतिकर्तव्यता मानणारे लोक 'जाऊ दे' म्हणून सोडून देतात.

लेखकाची प्रतिमा, फोफावलेले लेखक-कवी, हौशी आणि व्यावसायिक लेखक अशा अनेक विषयांवर वेगळ्याने विस्तृत बोलायला हवं.

पण इथे मुद्दा अगदी सरळ कष्टाच्या आणि हक्काच्या पैशाचा आहे. मग तो लेखक असो नाहीतर हमाल. योग्य, पुरेसा मोबदला मिळायलाच हवा.

ठराविक मुदतीत आपले पैसे मिळाले नाहीत की बोभाटा करून ही गोष्ट सांगितली पाहिजे सगळ्यांना. हजार दोन हजारसाठी काही आपण कोर्टात जाणार नसतो म्हणून यांचं फावतं.

आणि निर्लाज्जासारखी पुढच्या वर्षी हे लोक आपल्यला दिवाळी अंकाची जाहिरात पाठवतात. परवडत नसेल तर मान्य करा, स्पष्ट कल्पना द्या, सांगा आणि धंदा गुंडाळून गप्प बसा. फसवू नका. फक्त लेखकच नव्हेत; वेगवेगळ्या ठिकाणी असे एकएकटे काम करणारे लोक असतात. त्यांच्या अशा छोट्या मोठ्या रकमा बुडवल्या जातात. राजरोसपणे बुडवणाऱ्यांचे धंदे चालू राहतात. आपल्या कौशल्याचा, कष्टाचा मान राखला जात नाही. आणि आपण काय करू शकतो?

पुढच्या वेळी पैशांचं स्पष्ट बोलल्याशिवाय काम घ्यायचं नाही हा धडा. ठीकाय मला हा धडा मिळाला. पण यंदा त्यांनी अशी दुसरी नवी मृदगंधा शोधली असणार. दुनियादारीच्या एका धड्यासाठी ती यावर्षी फुकट काम करून देणार.

याला काही उपाय नाही?