सणा-वारांविषयी माझ्या मनात पहिल्यापासून एक बंडखोरी आहे.
आई सोवळ्यात असताना थेट अंथरुणातून उठून तिला मिठी मारणं, नैवेद्य दाखवायच्या आधी पदार्थ खाणं, मासिक पाळीत बाजूला बसलेल्या बाईला मुद्दाम शिवणं, अंघोळ न करता गणपतीच्या आरतीला उभं राहणं, सत्यनारायणाला नमस्कारच न करता थेट प्रसादासाठी हात पुढं करणं, चांगल्या कार्यक्रमाला काळे कपडे घालणं, उपवासाच्या दिवशी अंडी खाणं ही यादी बरीच मोठी आणि गंभीर होत जाऊ शकते.
मुद्दा हा आहे की 'हे करायचं असतं' म्हणलं की 'मी नाही करत जा' हे ठरलेलं आहे.
परवा दसऱ्याला मला पर्याय होता, दाराला तोरण लावण्याचा किंबहुना न लावण्याचा. पण मला दसरा म्हणाल्यावर काय आठवत होतं?, आम्ही भावंडांनी मिळून केलेल्या झेंडूच्या माळा, आईनं चक्का टांगून केलेलं केशर श्रीखंड, दिवाळीची चाहूल देणारे नवेनवे कपडे, एकत्र जेवण, लोळून काढलेली दुपार आणि संध्याकाळभर गल्लीत फिरून दिलेलं सोनं, घरात सोनं घेऊन येणारी आजूबाजूची चिल्लीपिल्ली. ...
या सगळ्यामध्ये न पटण्यासारखं , न आवडण्यासारखं काहीच नाही. संक्रांतीबद्दल पण हेच, गणपतीचं पण हेच, नवरात्री-होळी-दिवाळी-आषाढी... सगळ्याविषयी हेच.
सौंदर्य, संगीत, सहभोजन यात खटकण्यासारखं काय आहे?
आणि मग तरीही मग माझ्यामध्ये ही बंडखोरी कुठून आली? तिचं मूळ काय?
हे सगळं नाकारून फक्त माझं मन शांत होत नाही तर जे ''करू नये'' म्हणून सांगतात ते करून दाखवायची माझी तयारी असते. हा असा सणांविषयीचा सुप्त द्वेषच माझ्यात आलाय कुठून?
खूप विचार केल्यावर मला त्याचं मूळ सापडलं. एकंदरीत सणा- वारांविषयीचा द्वेष, संसारिक गोष्टीतील निरुत्साह, हौस- श्रद्धा यांचा अजिबात अभाव... या सगळ्यांचं कारण माझ्या सगळ्या नात्यातल्या, ओळखीच्या तायांमध्ये आहे. माझ्या कळत्या वयात मी या सणा- वारांच्या दिवशी माझ्या तायांना राबताना पाहिलं,
''अशीच रीत असते,आमच्यात असंच असतं, हे करावंच लागतं, आपल्यात हीच पद्धत आहे" अशी वाक्यं ऐकत त्या हे सण समारंभ करत राहिल्या.
पहाटे उठून रांगोळी काढणारी पण तीच, सगळ्यांचा चहा करणारी पण तीच, सगळ्यात आधी अंघोळ करणारी पण तीच, मिक्सर असताना पाट्यावर पुरण वाटणारी तीच, सोवळ्यात स्वैपाक करणारी तीच, वाढणारी तीच, खरकटं उचलणारी तीच, दुपारी सगळे खाऊन पिऊन आडवे झाले की बाईला भांडी काढून देणारी तीच आणि सणासुदीला यांच्या गप्पा रंगल्या की वेळी अवेळी चहा- कॉफी टाकणारी पण तीच.
तिला दमायला वेळ नाही, थकलेल्या चेहऱ्यानं बसून राहायला परवानगी नाही... सण आहे ना !! त्यामुळं तिनं साडी पण नेसली पाहिजे, दागिने पण घातले पाहिजेत, रांगोळी पण काढली पाहिजे, पक्वान्नाचा स्वैपाक पण केला पाहिजे, कुणाला काही मागायला लागता कामा नये असं छान तिनं वाढलं पण पाहिजे, हसत खेळत यांच्या गप्पात सामील पण झालं पाहिजे.
माहेरी असली काय, सासरी असली काय, पाहुण्यांकडे असली काय माझी ताई आपली सगळीकडे पदर खोचून उभीच, सतत कामातच.. ती कायमच कशी शेवटच्या पंगतीला जेवते?
या रूढी-परंपरा, सणवार, उपास तापास, देव धर्म अशा रूपातून आलेल्या हट्टी, आग्रही, माजुरड्या, क्रूर, पितृसत्ताक संस्कृतीसमोर मी माझ्या या नात्यातल्या, ओळखी-पाळखीच्या तायांना सतत शरणागती पत्करताना पाहिलं, हतबल झालेलं पाहिलं.
त्या देखील नटल्या, हसल्या, रमल्या... नाही असं नाही.
पण हे सगळे निर्णय त्यांचे होते? त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या वेळी, त्यांनी स्वखुशीने केलेल्या निवडीच्या वेळी त्यांच्यासमोर पर्याय होते? आणि असतील तर ते कुठले होते?
झेंडूच्या फुलांचं तोरण करून दरवाजाला लावायचं की नाही, कधी लावायचं? हे पर्याय आज माझ्याकडे उपलब्ध होते. माझ्या तायांच्याकडे हे पर्याय होते?
त्या रमल्या की हरवून गेल्या? त्यांच्यासाठी हे सण फक्त सहज स्वाभाविक सौंदर्य, संगीत आणि सहभोजन होतं?
त्याग, सहनशक्ती यांना दिलेलं अनावश्यक महत्व, तिच्या कर्तव्यांचं केलेलं अवडंबर, आणि संस्कारांच्या नावाखाली तिला कमजोर बनवणारं तिचं माहेर... हे मूळ आहे माझ्या बंडखोरीचं... ही साखळी माझ्यापाशीच तुटली तर किती बरं होईल?
आपले सण सौंदर्य, संगीत, सहभोजन आणि सजण्या-सवरण्याचे आणि संपूर्ण ऐच्छिक झाले तर किती बरं होईल?


