नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..


 

प्रेमावर आपण भरपूर बोलतो, भरपूर लिहितो. पण सॉक्रेटीसच्या खोडीप्रमाणं प्रेमाची व्याख्या करायला जात नाही.

एखाद्या माणसाचा सहवास हवासा वाटणं म्हणजे प्रेम?

एखादा माणूस पटणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसावर हक्क वाटण्याइतपत तारा जुळणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसाच्या आपलं असण्यानं सुरक्षित वाटणं म्हणजे प्रेम?

मानसिक, शारीरिक, सामाजिक संकोच ज्या माणसासमोर राहत नाही ते प्रेम?

सामाजिक अनुरूपता म्हणजे प्रेम?

की वैचारिक भारलेपण म्हणजे प्रेम?

शारिरीक आकर्षण हे प्रेमाचं श्रेय असतं का खरंच?

एखाद्याकडून शून्य अपेक्षा आणि लाखभर सदिच्छा म्हणजे प्रेम?

की न ठरवता, न मोजता, विश्लेषण न करता ऋतूत झाड मोहरून यावं तसं दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात मिसळून जाणं म्हणजे प्रेम?

वेळ, वय, ऊन- पाऊस, माती, बीज... कुणाचं श्रेय नाही यात?

एखादा माणूस उलगडत जाईल तसा पटत जायला हवा.

'सोबत' घडणं आणि 'सोबत' निभावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.  

प्रवाह मिसळतात आणि रेल्वेचे रूळ? एकत्र पण, समांतर....

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

बस् एवढी एकच अट आहे, की, सहवास घडावा..निभावावा लागू नये.

नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..

आपलं अद्वैत असावं- समांतर चालावं लागू नये..

बस् एवढी एकच अट आहे...की,

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा