आमच्या 9वी ‘अ’ चा पट साधारण 72-74
असा
काहीतरी होता. त्यातल्या एकूण 20 जणींची नावं सुद्धा मला आता सांगता येणार
नाहीत; किंबहुना तेव्हा देखील सांगता आली नसती. आमचा आमचा असा 7-8
जणींचा
ग्रुप होता.
पहिली ते पाचवी या इय्यतांसाठी फ्रॉकसारखा गणवेश आणि सहावी ते दहावीसाठी
चुडीदारसारखा गणवेश होता. आम्ही नववीत गेलो आणि चौकड्याचा चुडीदार बदलून शाळेने
प्लेन चुडीदार केला. नोटीस लागली. मी घरी सांगितलं. आई म्हणाली,
‘ठीक आहे.
रविवारी जाऊन नवीन गणवेश घेऊन येऊ.’ दुसऱ्या दिवशी सारिकाचे वडील वर्गशिक्षकांना
भेटायला आले.
"अहो आता कुठून आणायचा नवीन ड्रेस?
माझ्या
मोठ्या पोरगीचा ड्रेस सारिका घालती. हे वर्ष तो गेला असता. आता तुम्ही म्हणता तो
राहूदे नवीन घ्या. कशाला? काय वाईटाय आधीच्या ड्रेसमध्ये?
का बदलताय?"
"संस्थेचा निर्णय आहे.." आमच्या बाई
याहून अधिक काहीच बोलल्या नाहीत.
सारिकासारख्या मुली प्रत्येक वर्गात होत्या. कोणाचा बाप म्हणाला,
‘सोडून दे
शाळा’, कोणाचा म्हणाला, ‘घेणार
नाही
म्हणून सांग नवीन ड्रेस’, कोणी म्हणलं,
‘पुढच्या
महिन्यात घेऊया माझी अंबाबाई’..
सारिका आमच्यात आली. आम्हाला म्हणाली, "आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं तर ते
निर्णय बदलतील. आपण सगळ्या मिळून पत्र देऊ. सहावीत नवीन येणाऱ्या मुलींपासून नवा
गणवेश करा म्हणू. आमचा जुन्या मुलींचा दहावीपर्यंत हाच राहू दे. चला आपण मिळून जाऊ
बाईंकडं"
आम्हाला तिचं म्हणणं पटलं. पण मिळून जायला आम्ही नकार दिला.
"का गं?"
ती
म्हणाली.
"कारण नवीन गणवेश आला तरी मला फरक पडत
नाही.."
तिनं मग मला पुढं काही विचारलं नाही. शाळेने काही गरीब मुलींना नवीन
गणवेशाचं वाटप केलं. त्यात सारिकाला देखील गणवेश मिळाला. मला बरं वाटलं. तो तिला
अपरा व्हायचा. गुडघ्याच्या वर बसायचा. सारिका उंच होती ना. पण हळूहळू त्याची सवय
झाली.
नववीचं बीजगणित-भूमिती अवघड होतं. त्यात आमचे गणिताचे मास्तर. वर्गात
यायचे. गणित फळ्यावर लिहायचे. आणि सरळ गणित सोडवायला घ्यायचे. ‘वहीत उतरवून घ्या’
असं आम्हाला म्हणायचे आणि तासाची घंटा झाली की निघून जायचे. काहीच समजायचं नाही
आम्हाला.
मी घरी सांगितलं. बाबांनी मला गणितासाठी शिकवणी लावली. बाबांचं गणित चांगलं
आहे माझ्या. त्यामुळं ते पण उजळणी घ्यायचे.
दिपाली मला म्हणाली, "आपण आपल्या वर्गशिक्षकांना सांगूया. काय
समजत नाही आम्हाला म्हणून. ते काय शिकवतच नाहीत तर काय समजणाराय?"
मी नकार दिला.
मला तिचं म्हणणं पटलं होतं. पण मिळून वर्गशिक्षकांकडे जायला मी नकार दिला.
"का गं?"
ती
म्हणाली.
"मला गणिताची शिकवणी आहे ना. शाळेत काही
शिकवलं नाही तरी मला फरक पडत नाही.."
दिपाली कोणाकोणला शंका विचारायची, पुन्हा पुन्हा उजळणी करायची,
चक्कं
उत्तराच्या पायऱ्या पाठ करायची. ती धडपडत शिकत राहिली.
आंतरशालेय एकांकिका स्पर्धा होत्या. अचानक विज्ञानाच्या तासाला संगीताच्या
बाई वर्गात आल्या. त्यांनी आमच्या 7-8 जणींची नावं घेतली. माझे उच्चार चांगले
होते, सानिका पेटी वाजवायची, कोमल नाचायची छान,
पूजा
दिसायला सुंदर होती, शलाका आणि अक्षताचा अभिनय चांगला होता.
विज्ञानाचा तास चुकवून जायला मिळालं म्हणून मी खुश झाले. ‘संगीत सौभद्र’ चा काही
भाग बाई बसवणार होत्या. मी कृष्णाच्या प्रेमात पुन्हा पुन्हा नाटक वाचून तोंडपाठ
केलं. मयुरीला बाईनी बोलावलं नव्हतं. ती मला म्हणाली,
"मला संबळ चांगली वाजवता येती. तू ऐकलीयस
की. बाईना सांग की”
“अगं पण सौभद्रात कशाला हवी संबळ”
“मग वेगळं नाटक बसवायला सांगू की. एक वर्ष
आड हेच एकच नाटक बसवतात. आणि संबळ राहू दे. पण त्यांना ऑडीशन
घ्यायला सांगू यार. दरवर्षी तुम्हीच नाटक करणार काय. आणि तेच तेच नाटक सारखं. याला
काय अर्थय?"
“पण मला कृष्ण आवडतो अगं”
“कृष्ण आवडतो ना,
मग
कृष्णाचंच वेगळ कायतर नाटक करूया की. गोपाळकाल्याचं करूया. ती 9
वी ‘फ’
मधली सुरेखाय ना ती पावा भारी वाजवती. तिला घेऊ. नाहीतर अजून कोणाला येत असेल तर
बघू. बाकी सगळे बाळगोपाळ. सगळ्यांचं जेवण एकत्र करायचं- झाला काला. ऑडीशन घ्यायला
सांगू की गं. वेगळं नाटक करूया की गं”
मला सौभद्र मधली गाणी आवडत असत. आजही आवडतात. बाईंनी मला नाटकात घेतलं
होतं. त्यामुळं मला फरक पडत नव्हता. मी मयुरीसोबत गेले नाही.
माझ्याच वर्गातल्या एका मुलीनं नववीत असताना बाईंच्या रागावण्याला घाबरून
वर्गात शु केली. त्यानंतर दहावी होईपर्यंत ती शेवटच्या बाकावर एकटी बसायची. एकटी
डबा खायची. मधल्या सुट्टीत एकटीच वहीत रेघोट्या मारत बाकावर बसून असायची. तिची आई
मला म्हणाली, ‘तिला तुमच्यात खेळायला घेत जा’. मी फार पुढाकार घेतला नाही. मी तिला घेऊया
म्हणलं तर मला सुद्धा माझ्या मैत्रिणी सोडून देतील आणि आपण सुद्धा तिच्यासारखे
एकटे पडू या भीतीनं मी तिला टाळत राहिले.
वर्षाचं दहावीत असताना लग्न झालं. आम्ही बारावीत गेलो तोपर्यंत तिला एक
मुलगा झालेला. ‘अव्वा... तिला बाळ पण झालं!!!’ असं म्हणून मी तोंडावर हात ठेवला.
प्रज्ञाचं 11वी तल्या एका मुलाशी लफडं होतं. अशा वाया
गेलेल्या मुलीशी आम्ही बोलायचो नाही. प्रेमात पडून लफडी करणाऱ्या मुलींच्या नादाला
लागायचं नाही हे आम्हाला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळं शाळेत ती एकटी एकटीचं असायची.
एखाद्या घाणेरड्या वस्तूकडे पाहावं तसं आम्ही तिच्याकडे पाहत होतो.
"काल शाळेतनं परत जाताना साने गल्लीत एका
मुलांनं मला अडवलं. माझा हात धरला. मला खूप भीती वाटतीय. घरी सांगितलं तर पप्पा
मला मारतील. सर तुम्हीच काहीतरी करा ना"- संगीता म्हणाली.
सरांनी त्याच गल्लीत राहणाऱ्या शाळेतल्या 3-4
मुलींशी
तिची ओळख करून दिली. थोडे दिवस सगळ्याजणी एकत्र जात जावा म्हणून सांगितलं.
एका मवाल्यानं हात धरलेली मुलगी. आम्ही तिच्यापासून चार हात लांबच राहत
होतो. तिच्याकडे पाहिलं की काहीतरी अस्वच्छ, घाणेरडी फिलिंग यायची.
स्वरूपा आमच्या ग्रुपमध्ये होती. पण तिच्या घरी जेवायला मात्र ती फक्त मला
बोलवायची. आम्ही दोघी जातवाल्या होतो ना. पायल मला म्हणाली,
‘ तू तिला
जेवायला येणार नाही म्हणून सांग. बोलावलं तर सगळ्यांना बोलवायला पाहिजे’
मला सगळ्यांच्या घरी जेवायला बोलवत. काही घरात तर जेवणानंतर मला अकरा रुपये,
एकवीस
रुपये सुद्धा मिळायचे. मी पायलचं बोलणं मनावर घेतलं नाही. मला फरक पडत नव्हता.
आजही पडत नाही. बहुतांश गोष्टी या माझ्यासाठी बातम्या असतात फक्त. निव्वळ
एक चर्चेला विषय. मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून मी या कुळात जन्माला आले. नाव,
गाव,
आडनाव,
आई-वडील...
सगळं कसं यथासांग.
इतकं सगळं असूनही मनात कायमची एक भीती आहे. संशय, शंका, अविश्वास, असुरक्षितता मनात भरून राहिलेली आहे. असं
वाटतं की एखाद दिवस हे सगळं नष्ट झालं तर, अचानक हा बँक बॅलन्स- ही इज्जत, ही सहज मिळणारी संधी- हे सगळे प्रीविलेजेस
एकदम नाहीसे झाले तर? यांच्याशिवाय मला काय अस्तित्व आहे?! मग मी पोथ्या वाचते, जप-जाप्य करते. असाच कशाचाही काहीही फरक
न पडता मला जगता यावं म्हणून मी देवाची आराधना करते, पत्रिका बघते, होम हवन करते. ‘हे असंच असतं. मी पूर्व
पुण्याईने हे मिळवलेलं आहे’ यावर इतरांचाही विश्वास बसावा, श्रद्धा जडावी असं मला वाटतं,
कारण तरच
माझं स्वार्थीपणाचं हे सगळं जगणं यथासांग सुरळीत चालणार आहे.
‘मी कोणाच्या अध्यात-मध्यात नाही’ हे नक्की अभिमानाने सांगण्याचं वाक्य आहे
की खालमानेने सांगण्याचं असा प्रश्न मला पडायला लागलेला आहे. ‘कोणाच्या
अध्यात-मध्यात न पडता’ जगण्याची चैन मला परवडते. अराजकीय-अनअवेअर-इग्नोरंट
राहण्याची चैन मला परवडते.
ज्या माझ्या नाकर्तेपणाची मला लाज
वाटायला पाहिजे ती गोष्ट मिरवायला शिकवणारी ही संस्कृती, हा
इतिहास, ही कला, ही
सामाजिक-आर्थिक व्यवस्था युगानुयुगे टिकावी.!!!