शाळेत असताना मी मालिका बघायचे. आमच्या घरी टीव्ही नव्हता तेव्हा शेजारी आजोबांकडे जाऊन बघायचे. सध्याच्या चालू मालिका बघता 'मी पूर्वी मालिका बघायचे' हे सांगण्याची सोय राहिलेली नाही. पण खरंच बघण्यासारख्या मालिका तेव्हा बनत होत्या. 'झोका' पासून 'साराभाई vs साराभाई' पर्यंत बरीच मोठी लिस्ट होऊ शकेल.
आजच big bang theory बघून पूर्ण केली.
मालिका.. म्हणजे टीव्ही किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कुठल्याही माध्यमातून माझ्यापर्यंत येणाऱ्या.
मालिकांमधून मिळणारा आनंद, मनोरंजन, विचार या सगळ्या गोष्टी एका बाजूला. म्हणजे त्या आहेतच. पण मला वाटतं मालिका या प्रकारामध्ये एक प्रकारचं हिप्नॉटीझम आहे. माझं मानसिक, बौद्धिक रिकामपण, घरातलं एकटेपण यावर एक पर्याय म्हणून मी मालिका बघत राहते. उद्यासाठी काही प्लॅन नसणं, भविष्यासाठी ध्येय नसणं, सातत्यानं जपलेला छंद नसणं- अशा जाणीवा टाळण्यासाठी माझी बुद्धी गोठून राहणं गरजेचं असतं आणि ते काम या मालिका करत असाव्यात. वेळेचा विसर पडायला मदत करणाऱ्या, बुद्धीला गुंतवून ठेवणाऱ्या, वास्तवापासून वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या या मालिका म्हणजे एक नशा, एक व्यसन तर नाही ना?
मालिका नसतील तर माझा वेळ जाईल?
स्वतःला टाळण्यासाठी मी मालिकांमध्ये डोकं खुपसून बसते का?
एक मालिका संपली की मला रिकामपण येतं. शेवटच्या एपिसोडला मी अस्वस्थ होते. पुन्हा नवीन मालिका बघायला सुरु करेपर्यंत अस्वस्थता कायम राहते.
माझी नशेची लिस्ट वाढतच चालली आहे. दारू, देव आणि आता डेली सोप...म्हणजे मालिका....
एकामागोमाग एक season वर season बघताना मी वर्तमानापासून पळत असते काय?
मालिकेशिवाय काही दिवस, महिने मी रहायचं ठरवलं आहे. त्या प्रयोगाचं काय होतंय यावर तेव्हा पुन्हा लिहीन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा