यावर्षीच्या
दिवाळी अंकांच्या जाहिराती बघून मला आठवण झाली. मागच्या वर्षी एका दिवाळी अंकाने
माझ्याकडून कथा मागवून घेतली होती आणि दुसऱ्या एका दिवाळी अंकासाठी मी एक अनुवाद करून
दिलेला होता. आजतागायत मला त्याचे पैसे मिळालेले नाहीत. पहिल्या सहा महिन्यामध्ये
मी पाठपुरावा केला. त्यांनीही पैसे देण्याचं पुन्हा पुन्हा कबूल केलं. पण पैसे
दिले नाहीत. दुसऱ्याच्या कष्टाचं खाऊन यांना झोप कशी लागते याचं मला आश्चर्य
वाटतं.
पैशांचे
वांदे झाले असतील तर तसं स्पष्ट सांगून त्यांनी हा दिवाळी अंकाचा उपद्व्याप बंद
करायला हवा होता. पण असे अनेक फुकटे लोक दरवर्षी माझ्यासारखा नवीन बकरा शोधतात आणि
आपले दिवाळी अंक भरतात. छापून येण्यात लेखनाची इतिकर्तव्यता मानणारे लोक 'जाऊ दे'
म्हणून सोडून देतात.
लेखकाची
प्रतिमा, फोफावलेले लेखक-कवी, हौशी आणि व्यावसायिक लेखक अशा अनेक विषयांवर
वेगळ्याने विस्तृत बोलायला हवं.
पण
इथे मुद्दा अगदी सरळ कष्टाच्या आणि हक्काच्या पैशाचा आहे. मग तो लेखक असो नाहीतर
हमाल. योग्य, पुरेसा मोबदला मिळायलाच हवा.
ठराविक
मुदतीत आपले पैसे मिळाले नाहीत की बोभाटा करून ही गोष्ट सांगितली पाहिजे
सगळ्यांना. हजार दोन हजारसाठी काही आपण कोर्टात जाणार नसतो म्हणून यांचं फावतं.
आणि
निर्लाज्जासारखी पुढच्या वर्षी हे लोक आपल्यला दिवाळी अंकाची जाहिरात पाठवतात.
परवडत नसेल तर मान्य करा, स्पष्ट कल्पना द्या, सांगा आणि धंदा गुंडाळून गप्प बसा. फसवू नका. फक्त
लेखकच नव्हेत; वेगवेगळ्या ठिकाणी असे एकएकटे काम करणारे लोक असतात. त्यांच्या अशा
छोट्या मोठ्या रकमा बुडवल्या जातात. राजरोसपणे बुडवणाऱ्यांचे धंदे चालू राहतात.
आपल्या कौशल्याचा, कष्टाचा मान राखला जात नाही. आणि आपण काय करू शकतो?
पुढच्या
वेळी पैशांचं स्पष्ट बोलल्याशिवाय काम घ्यायचं नाही हा धडा. ठीकाय मला हा धडा
मिळाला. पण यंदा त्यांनी अशी दुसरी नवी मृदगंधा शोधली असणार. दुनियादारीच्या एका
धड्यासाठी ती यावर्षी फुकट काम करून देणार.
याला
काही उपाय नाही?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा