स्वतःची प्रत्येक वेदना वसूल करायची सवय लागल्यामुळं .....


अन्य अनेक कलांपेक्षा ‘लेखन’ हे मला प्रीविलेज वाटतं. लिहिण्याइतका वेळ, साधनं माझ्याकडे आहेत आणि माझ्या लिखाणातून पैसे मिळवण्याची माझी इच्छा आणि गरज नाही. हे प्रिव्हिलेज आहे नाही का? स्वतःच्या छोट्या-मोठ्या भावनांवर लिहून झालं. मग दुसऱ्यांच्या प्रश्नांवर लिहून झालं. 

आयत्या मिळालेल्या प्रिव्हिलेजच्या गिल्ट मधून थोडं बाहेर पडता यावं म्हणून मी पुढारलेलं होण्याचा प्रयत्न करते, सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न करते, माझ्याकडून डीस्क्रीमिनेशन होणार नाही असा प्रयत्न करते. पण खोल आत मात्र माझ्यामध्ये एक जाणीव आहे जी कधी कधी माजात रुपांतरीत होते; माझ्याही नकळत. एक जाणीव की, मी बहुसंख्याक आहे, उच्चवर्णीय आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, माझ्या बंडखोर वागण्याविषयी माझ्या कुटुंबाचा सपोर्ट आहे, माझ्यावर निखळ प्रेम करणारी माझ्यापाशी काही माणसं आहेत. मला जगावर रुसता येतं, अकारण मूड घालवून तासंतास तंद्री लावून आभाळाकडं बघत बसता येतं. माझ्या टॅनट्रम्सना महत्व देऊन माझी समजूत घालणारी, माझे लाड करणारी, माझं मन राखणारी माणसं माझ्याकडे आहेत. 

माझं काम देखील असं की जे न केल्यानं जगाचं काही अडणार नाही. माझ्या अस्तित्वाची गरज नाही. नसून खोळंबा नाही. आणि तरीही मी पक्की मतं घेऊन माजात जगतीय. कशासाठी आणि काय लिहावं तेच कळत नाहीय. कोणाशीच कनेक्ट होता येत नाहीय. देव, धर्म, परंपरा, प्रेम, कुटुंब, शिक्षण, करिअर सगळ्या सगळ्या गोष्टींच्या व्याख्यांचा, संकल्पनांचा आणि त्याच्या होत असलेल्या अंमलबजावणीचा मनात प्रचंड गोंधळ झालेला आहे. 

World is full of contradictions. सत्याचा शोध निष्फळ किंवा अनंत किंवा क्लेशदायक व्हायला लागलेला आहे. अनुत्तरीत प्रश्न घेऊन जगण्यापेक्षा प्रश्नाशिवाय जगलेलं बरं की काय असं वाटायला लागलंय. 

अन्यायात जगणाऱ्या माणसाला अन्यायाची जाणीव करून देणं इतकं कठीण का आहे? माणसाला सत्ता का हवी असते? प्रेम नैसर्गिक का नाही? सौंदर्य-पैसा या निकषांशिवाय आपण का एखाद्याला कुटुंबात-कामाच्या ठिकाणी सामावून घेऊ शकत नाही? आपण इतके भित्रे का असतो? ‘कधीही मृत्यू येऊ शकतो’ या अनिश्चिततेत आपण जन्मापासून असतो. मग आपण सुरक्षिततेच्या इतक्या मागे का असतो? देव सगळं बघतोय असं मानणारा माणूस भ्रष्टाचार कसा करतो? दया-क्षमा या तत्वांना देखील जाती धर्माचे- आर्थिक परिस्थितीचे- सामाजिक पोजिशनचे निकष कसे काय लागतात? आपण पैसेवाल्यांना महागड्या भेटवस्तू देतो आणि गरजूला मदत करत नाही असं का? जिवंत माणसाला द्यायला आपल्याकडे वेळ आणि पैसा नसतो आणि त्याच्या उत्तरक्रियेसाठी आपण कर्ज सुद्धा काढायला तयार असतो असं का? आपण स्वच्छता मिरवतो पण स्वच्छतेची कामं करायला आपल्याला लाज का वाटते? आपण स्वतःशी संवाद बंद का करतो? स्वतःच्या नजरेत पडूनही आपण डोळे झाकून कसे जगत राहू शकतो? 

माझ्या अनुरागात अट असते. प्रार्थनेत अर्चना असते. सज्जनतेत अपरिहार्यता असते. मदतीमध्ये स्वार्थ असतो. निखळ, निर्मळ, निष्फळ असं मी कधीही काहीही करत नाही. 

निरर्थकाशी ओळख व्हायला लागल्यापासून अर्थाशी फारकत झालेली आहे. म्हणून लिहावसं वाटत नाही. 

पण स्वतःची प्रत्येक वेदना वसूल करायची सवय लागल्यामुळं हेही लिहूनच काढलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा