जगाएवढं
मोठं जग होतं माझं, मी लहान असताना
अख्ख गाव माझं घर होतं, मुळात घर लहान असताना...
हळूहळू कळत गेली तहान भूक
मोह माया
शेवटाच्या प्रारंभी निव्वळ
काया...
माझं घर, माझी माणसं, माझं
काम, माझा पैसा
माझ्या माझ्या जगामधला माझा
माझा पसारा...
पाऊस माझा पाहुणा होता, वारा
वात्रट सवंगडी
वाटा सगळ्या अनोळखी; तरी सहज
सुटत चालण्याची कोडी...
माणसांचे दोनच प्रकार होते-अनोळखी नि ओळखीचे
अविश्वासाचा वेढा पडण्याआधी,अबाधित होते राज्य विश्वासाचे...
जग कळत नव्हतं तोवर अख्ख जग
माझं होतं
कळत गेलं तसं सारं, माझं मी
मोजून घेतलं...
लहान लहान होत होत माझं घर
चारच खोल्यांचं झालं
तिथूनही कळेना कधी माझ्या
एवढुश्या खोलीत जाऊन सामावलं...
एवढ्याशा फोन मधून जग
समजताना माझं जग फोन एवढं,
छोटं छोटं होत होत छोटं
छोटं होत गेलं.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा