तुझं अस्तित्व जाणवण्याइतका वेळच सध्या मला मिळत नाही. 'देव सगळं बघतोय' असं आजी म्हणायची. मला ते खरं वाटायचं. त्याच्याकडं सतत काहीतरी मागत राहणं हे देवाशी असलेलं माझं सुरवातीचं नातं होतं. वाईट वागताना 'देव बघतोय' असं वाटायचं पण तेही अगदी लहानपणी पुरतं. मग मी दुनियादारीच्या नावाखाली निर्ढावत गेले.
हळूहळू देवाचं स्वरूप बदललं. त्याचं अस्तित्व हळूहळू मोठं मोठं होत गेलं, आणि माझं कमी. त्यामुळंच की काय, सगळ्या गोष्टींची जबाबदारी देवावर येत गेली. कारणही तोच, परिणामांना जबाबदारही तोच ! मग सगळंच रामभरोसे होत गेलं आणि मी निष्क्रिय होत गेले.
दारू आणि देव या दोन्ही नशाच! आपल्याला धुंद राहण्याची, निष्क्रिय राहण्याची मोकळीक देणाऱ्या! दारूपेक्षा देव जालीम. कारण तो कोणालाही वर्ज्य नाही, त्यातून कोणाचीही सुटका नाही आणि त्याला व्यसन म्हणून मान्यताही नाही.
आता मात्र तर्कांच्या मागं लागून मी त्याचं अस्तित्व विसरत चाललीय वा हळूहळू मिटवत चाललीय म्हणूया..
आजीची 'देव बघतोय' ही संकल्पना आणि तुकारामाचा 'देव होऊनिया आलो' हा दावा यांचा परस्पर संबंध असावा. स्वयंशिस्तीशी, आत्मपरीक्षणाशी त्याचा संबंध असावा.
मी तर्काच्या आधारावर माझंच वागणं तोलून पाहिलं पाहिजे. 'देव बघतोय' म्हणजे 'मी बघतोय'.
मी बघितलं पाहिजे, मी जबाबदारी घेतली पाहिजे.. मी माझ्या नजरेत 'देव' झालं पाहिजे.
'कभी कभी लगता है की अपुनही भगवान आहे....' its a good start.. what say??
खुपच मस्त विचार आहे. I liked it!!!!!
उत्तर द्याहटवाKya baat hai...tumhi shevat khupch chan kelay...lakkh Prakash padla mazyat
उत्तर द्याहटवा