सातची बस कधीच सात वाजता यायची नाही. आम्ही ताटकळत येईल त्या बसकडे आशेने पाहत असायचो. लाल डब्ब्याच्या ऐवजी हिरकणी यावी अशी मी मनात देवाकडं प्रार्थना करत असायचे. कारण हिरकणीच्या खिडकीशी माझी उंची पोचायची. 'आता येउदे कधी यायची तेव्हा' असं म्हणून आशा सोडून निवांत बसलं की एकदम राणीच्या थाटात धूळ उडवत ती लाल बस यायची. 7 आणि 8 अशा दोन बसच्या प्रवाशांची झुंबड मग या एकाच बससाठी.
आई मला सांगायची, 'पटकन जा आणि तीन सीटची जागा पकड'.
मी चालत्या बस सोबत चालत चालत दरवाजाशी थांबायचे. आपण पहिलेच आहोत म्हणजे जागा मिळणार म्हणून मी खुश. दरवाजा खडखड करत उघडायचा. आतले प्रवासी आधी उतरतील मग आपण आत चढू म्हणून मी उतरत्या प्रवाशांना जागा देत थोडी सरकून उभी राहायचे. तेवढ्यात माझ्या मागे थांबलेली माणसं उतरत्या प्रवाशांना धक्काबुक्की करत आत शिरायला लागायची. तिथं एकदम चेंगराचेंगरी सुरु व्हायची. माझा जीव गुदमरायचा. मी मागे पडायचे. आणि आम्हाला जागा पण मिळायची नाही.
बऱ्याच वर्षांनी काही व्यावसायिक कामानिमित्तानं फाईव्ह स्टार हॉटेलला जाण्याचा प्रसंग आला. तिथे 8-8 लिफ्ट होत्या. 15-20 सेकंद लिफ्टची वाट बघताना सुद्धा माझ्या आजूबाजूचे 10-12 जण उतावीळ झाले होते. लिफ्ट आली. मी रांगेत पहिल्या नंबरात होते. आतल्या लोकांना बाहेर येता यावं म्हणून मी थोडी जागा करून दिली. पण माझ्या मागचे लोक आत शिरले. संथ चालणाऱ्या त्या लोकांचा आतून बाहेर आणि बाहेरून आत हा ओघ एकत्रच सुरु झाला. माझा जीव गुदमरला. मी मागे पडले आणि मला ती लिफ्ट मिळालीच नाही. पुढच्या लिफ्टची वाट बघत मी दुसऱ्या लिफ्ट समोर जाऊन परत रांगेत उभी राहिले.
शिवनेरी मध्ये प्रवास करताना फोनवर मोठ्याने व्हिडीओ लाऊन ऐकणारे प्रवासी कोणाकोणाच्या नशिबात आले आहेत?
लहान मुलांना मांडीवर घेऊन कार चालवणारे महाभाग कोणी कोणी पाहिले आहेत?
अशा छोट्या छोट्या अनुभवापासून ते अणुबॉम्ब पर्यंत. त्या बॉम्बस्फोटानंतरची जपानची अवस्था, अणु बॉम्ब फेकणाऱ्या अधिकाऱ्याची त्या संहारानंतर पश्चातापातून झालेली अवस्था यावर काही लेख वाचनात आले तेव्हा पुन्हा पुन्हा जीव गुदमरतच राहिला.
देशादेशांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चाललेली चढाओढ पाहिली की वाटतं, की हे तंत्रज्ञान वापरण्याची माणसाची लायकी आहे का? आधी आतल्या प्रवाशांना बाहेर उतरू द्यावं आणि मग आपण आत चढावं हो गोष्ट खेड्यातल्या लाल डब्यात चढणाऱ्यांना देखील कळत नाही आणि शहरातल्या फाईव्ह स्टार हॉटेलवाल्यांना देखील कळत नाही.
आपण सगळ्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करतो हे तर सिद्ध गोष्ट आहेच. पण आपण त्या तंत्रज्ञानाचा उपयोग- वापर देखील शहाणपणाने करत नाही.
मंगळावर जाण्याची स्वप्न बघणाऱ्या, आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्समध्ये झेंडे गाडायला निघालेल्या संशोधकांना, तज्ञांना, शास्त्रज्ञांना, त्यांना फंडिंग करणाऱ्यांना, शासनाला या सगळ्यापेक्षा मॅनहोल मध्ये माणसाला उतरावं लागू नये यासाठी काही तंत्रज्ञान प्राधान्याने शोधावं असं वाटत नाही???
माणसाचं टू पॉइंट ओ वर्जन येईपर्यंत तंत्रज्ञानाची घौडदौड फ्रीझ करता आली तर? तंत्रज्ञान कशासाठी असावं, कसं वापरावं याविषयी जागतिक पातळीवर काही उहापोह झाला तर?
Thomas More चं युटोपिया वाचल्यापासून असे काहीबाही विचार मनात यायला लागलेत.
(माझ्या ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी मेल आयडी देऊन सबस्क्राईब करा.)
हताची बोटे जशी सारखी नाहीत तसे माणसाची विचार पण सारखे नाही म्ह्णूंंनच देवा ने सर्व चांगलं / वाईट कर्णेचा वीचार माणूस कड़े दिला आहे
उत्तर द्याहटवा