पण स्वातंत्र्यामधे एक स्वॅग आहे....

 



ज्या रूढी आपण इतक्या श्रद्धेने पाळत असतो त्याचं मूळ किती गमतीदार असू शकतं हे सांगणारी एक गोष्ट मध्ये माझ्या ऐकण्यात आली. लेखक माहिती नाही पण मी त्यांची ऋणी आहे.

गोष्ट अशी ... एक गाव होतं. गावात मांजरांचा सुळसुळाट झाला. पुजेअर्चेला ठेवलेलं तीर्थ, प्रसाद यांची नासाडी करण्यात मांजरांना समाधान मिळत असे. एके दिवशी एका घरातल्या मुलीला एक कल्पना सुचली. पूजेच्या दिवशी तिने मांजराला बुट्टीखाली ठेऊन त्यावर दगड ठेऊन दिला. पूजा यथासांग पार पडली. मग ही कल्पना सगळ्या गावानं उचलली. वर्षं सरली, काळ लोटला... कालांतरानं मांजरांची संख्या कमी कमी होत गेली. पूजेच्या दिवशी बुट्टीखाली मांजर ठेवायची प्रथा मात्र राहिली. आता गावात कोणाकडे पूजा असेल तर गावभर भटकून मांजर शोधून आणतात आणि त्याला बुट्टीखाली ठेवतात. एखाद दुसरंच मांजर आहे गावात पण त्याची मागणी वाढली आहे. तशी पद्धतच आहे ना त्यांच्यात. तशी प्रथाच पडली आहे.

अशा आपल्या सगळ्या समजुती, लहानपणापासून ऐकलेली कथा-पुराणे सगळ्यांना सुरुंग लावण्याची ताकद ज्योतिबा फुलेंच्या ‘गुलामगिरी’ मध्ये आहे.

‘गुलामगिरी’ कालच वाचून पूर्ण केलं. मत्स्य, कच्छ, विप्र, राक्षस, ब्रह्मा अशा कित्येक हिंदू संकल्पनांचं मूळ फुलेंनी सांगितलं आहे. कोजागिरी, पक्ष पंधरवडा, दिवाळी यांची कारणे सांगणारा इतिहास लिहिला आहे. जानवं, चार तोंडाचा ब्रह्मा, ज्योतिबा-खंडोबा-म्हसोबा यांची जन्मकथा सांगितली आहे. ‘गुलामगिरी’ हा ज्योतिबा आणि धोंडीबा यांचा संवाद आहे, आणि तोही सॉक्रेटीसच्या धैर्याने केलेला.

‘गुलामगिरी’ इसवीसन १८७३ मध्ये प्रकाशित झालं. त्यांच्या भाषेच्या दुर्बोधपणावर, व्याकरणावर, त्यांनी मांडलेल्या मतावर टीका देखील झाली.

फुल्यांनी लिहिलं ते सगळं आहे तसं खरं नसेलही, माहिती नाही. (फुलेंनी सगळ्या गोष्टी इतक्या convincingly लिहिल्या आहेत की ‘हां हे असं झालं असेल, बरोबर आहे, शक्यता आहे, हां रे’ असेच विचार वाचतांना येतात) पण एका क्षणासाठी त्यातल्या माहितीचा खरेखोटेपणा बाजूला ठेवला तरी गुलामगिरीमध्ये घेण्यासारखं मला खूप काही आढळलं.

एकतर फुलेंचं धारिष्ट्य. १८७३ च्या काळात ब्रह्मा, परशुराम, वामन, नरसिंह यांना मनुष्याच्या पायरीवर आणून त्यांच्या कथा सांगणं, चमत्कारांची चिकित्सा करून सत्य शोधण्याचा प्रयत्न करणं आणि तेही फुलेंसारख्या ब्राह्मणेतराने; ही सोपी गोष्ट नव्हती. दुसरे म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लॉजिकली बरोबर वाटतात.

‘आपल्याकडे हे असं करतात’ ‘आपल्यात हे चालत नाही’, ‘आपल्यात हे असं असतं’ ही वाक्यं पिढ्यानपिढ्या आपण पुढच्या पिढीला सांगत आलो. ‘गुलामगिरी’ आपल्याला प्रश्न करायला मदत करते, ‘असं का?’ असं विचारायला चालना देते. ‘कारणमीमांसा’ ही डोळे मिटून मागे चालण्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे हे ‘गुलामगिरी’ मधून कळू शकेल.

साहजिकच याचे आचरण सोपे नाही. स्वस्त नाही. पण गुलामगिरीपेक्षा स्वातंत्र्यामध्ये साहजिकच एक स्वॅग आहे....

२ टिप्पण्या: