मी पहिलीत असेन. ताई पाचवीला होती. शाळा सुटली की रोज संध्याकाळी आम्ही गल्लीत खेळत असू. सात वाजता आजी गल्लीतल्या सगळ्या पोरासोरांना गोळा करून शुभंकरोती, मनाचे श्लोक, रामरक्षा, पसायदान म्हणवून घ्यायची. गोष्टी सांगायची. मग आईचा स्वैपाक होईपर्यंत बाबा माझ्याबरोबर खेळायचे किंवा माझं मन रमेल असं बघायचे. दर गुरुवारी आई-बाबा आम्हाला नदीच्या घाटावर फिरायला घेऊन जायचे. अधून मधून इंजुबाई देवीच्या आवारात भूतकांडी खेळायला आम्ही जात असू. अख्खा रविवार अभ्यासाला सुट्टी असायची. पूर्ण वेळ खेळायचं. आई माझ्याबरोबर जिबलीनं खेळायची, बिट्ट्या खेळायची. अगदी आम्ही बहिणी नोकरीला लागल्यानंतर सुद्धा स्क्रॅबल, पत्ते, बॅडमिन्टन, कॅरम असा खेळांचा शिरस्ता चालूच राहिला.
काल सोशल डायलेमा ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर पाहिली. ऑनलाईन माध्यमे बनवण्यामध्ये सहभागी असणाऱ्या तंत्रज्ञांनीच त्या ऑनलाईन माध्यमांचे दुष्परिणाम त्यामध्ये सांगितले आहेत. त्यातला एक जण म्हणाला ‘मी जे ऑफिसमध्ये बनवतो त्याचं व्यसन मला स्वतःलाचं लागलेलं आहे असं माझ्या लक्षात आलं. माझी दोन मुलं मला सारखी बोलवत असतात आणि मी फोन मध्ये दंग असतो.’
कसंय ना, माझ्या लहानपणी सुद्धा मुलांना वेळ न देणारे आई बाबा होते आणि आजही आपल्या मुलांना वेळ देणारे आई बाबा आहेतच की.
एखाद्या गोष्टीचं व्यसन लागणं, एखाद्या माणसाच्या-विचारसरणीच्या आहारी जाणं, आपल्या माणसांना वेळ न देणं, प्रसिद्धीच्या मागे लागणं, अनावश्यक गोष्टींना महत्व देणं, ‘लोक काय म्हणतील’ याचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं... हे माणसाच्या स्वभावात आहे. ऑनलाईन माध्यमांनी आपल्याला हे शिकवलेलं नाही. त्यांनी आपल्यातल्या उपजत प्रवृत्तीचा फायदा करून घेतला आहे बस. आणि मनुष्याच्या इतिहासातला असा कोणता शोध आहे ज्याचा मनुष्यानं दुरुपयोग केलेला नाही?
व्यसन लागलंय हे मान्य करणं अवघड आहे. एकदा ते मान्य केलं की सोडवणं अवघड नाही. पण आता आपल्या लक्षात आलेलं आहे ना की आपण उगाच फेसबुक आणि इन्स्टा वर स्क्रोल करत बसतो, दिवसातले खूप तास ऑनलाईन माध्यमांमध्ये जातात, आपण जाहिरातींना बळी पडतोय, आपण मनाने एकलकोंडे आणि विचाराने टोकाचे होत चाललोय... आपण स्क्रोल करत राहू असा कंटेंट ही माध्यमे आपल्याला पुरवत राहतात, आपल्या गरजा वाढवून मग त्या गरजांची पूर्तता करणाऱ्या जाहिराती आपल्याला दाखवतात, लाईक-कमेंट-शेअर.. ट्रेंडीग होण्याचं खूळ त्यांनी माझ्या मनात पेरलेलं आहे, मी एकतर्फी कंटेंट वाचत-एकतर्फी व्हिडीओ बघत फार एकसुरी होत चाललीय. आणि हे सगळं साधलं जातंय त्या अल्गोरिदमच्या मदतीने.
बाबा सांगतात त्यांना नाटकांचं फार वेड होतं. पैसे साठवून, कुठच्या कुठे चालत जाऊन ते नाटक बघायचे, रविवारी रस्सा मंडळांमध्ये तांबडा-पांढरा, थोडं कमवायला लागल्यावर मित्रांसोबत पार्ट्या.. मी त्या वयात आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ‘ते बाबा’ मी कधी पाहिलेलेच नाहीत. मी त्यांचं वाचनाचं वेड पाहिलं, गणिताचं वेड पाहिलं, बागकामाचं वेड पाहिलं. ‘व्यसन लागतंय असं वाटलं तेव्हा सोडून दिलं....’, ‘प्रायोरिटीज बदलतात ना...’, ‘चव कळून, ती आवडून मग ती सोडून देण्यात मजा आहे....’, ‘माझ्या मनावर माझा ताबा असायला पाहिजे ना.. म्हणजे सोपं नाही ते.. पण गोल तो असायला पाहिजे ना....’ साधारण अशा अर्थाच्या सहज वाक्यांनी मला बाबांनी व्यसन करण्यातली आणि व्यसन सोडण्यातली मजा सांगितली.
सोशल डायलेमामध्ये ते म्हणाले की आपण त्यांचे कस्टमर नाही तर प्रोडक्ट्स आहोत. मोठ्या मोठ्या कंपन्या आपण त्यांच्या वस्तू विकत घ्याव्यात म्हणून आपला डेटा आणि तिथले अल्गोरिदम वापरतात, राजकीय पक्ष प्रोपोगँडा करण्यासाठी ऑनलाईन माध्यमं वापरतात. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हे ते खूप पूर्वीपासून करत आलेले आहेत. फक्त आता जरिया बदलला आहे एवढच. माणसाने नेहमीच गर्दीला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिटलरच्या मागे देखील गर्दी उभी राहिली आणि गांधींच्या मागे देखील उभी राहिली. गर्दी मॅन्युप्युलेट होत आलेलीच आहे. गर्दीसाठी गर्दीलाच उभं राहावं लागेल, कारण आर्थिक मंदी असो, दंगे असोत, युद्धं असोत.. बळी गर्दीतल्या माणसाचा जातो महालातल्या नाही.
ती डॉक्युमेंटरी नक्कीच अस्वस्थ करणारी आहे पण त्याचवेळी जागं करणारी देखील आहे. माणसाने बनवलेल्या कम्प्युटरशी माणसाला लढता येणार नाही? अल्गोरिदम, डेटा, कम्प्युटर.. मशीन्स प्रेडीक्टेबल आहेत.. माणूस प्रेडीक्टेबल नाहीय ना.! आपल्याला भावना आहेत आणि ही केवढी जमेची बाजू आहे. आपल्यात संवेदनशीलता आहे ही केवढी जमेची बाजू आहे. आपल्यात सद्सदविवेक आहे ही केवढी जमेची बाजू आहे. वरून कोणी कितीही कृत्रिम रोपण केलं तरी आपला आतला आवाज कोणाला हॅक करता येऊ शकत नाही. एक असं सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक वातावरण आपण तयार करू शकलो जिथे आप्तेष्ट आहेत, छंद आहेत, गुंगून जाता येईल अशा स्वैपाकापासून-साफसफाईपासून-बासरी वाजवण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत, जिथे शांतता प्रिय आहे, जिथे द्वेष वर्ज्य आहे तर कुणाची बिशाद आहे आपल्याला विकत घेतील, तालावर नाचवतील!!
मी कदाचित थोडी ऑप्टीमिस्टिक वाटत असेन .. आहेही.. पण कोण नाही? आपण सगळेच ऑप्टीमिस्टिक आहोत. आणि तोच आपल्यातला सर्व्हावल इंस्टिंक आहे.

छान लिहिलंयस
उत्तर द्याहटवाखूप सुंदर विषय आणि मांडणी
उत्तर द्याहटवाMasta!
उत्तर द्याहटवाVery true
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाKhupach sunder
उत्तर द्याहटवा