हाथरस केस

 


मी भाजी घेऊन घरी येत होते. गर्दीचा रस्ता,

दिवसा- उजेडी.. त्यांनी मला फरफटत नेलं. गर्दी बघत राहिली. मला ओरडता आलं नाही. मी घाबरलेले. आता वाटतं ओरडायला हवं होतं. कारण नंतर बुद्धिवान माणसं या घटनेची चर्चा करतील तेव्हा म्हणतील ' ती ओरडली का नाही?'.


त्या कळकट माणसांनी मला एका गावात नेलं. एका झोपडीवजा घरात. त्यांनी माझे बांधलेले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात हवस नाही क्रोध दिसत होता. हे पण मी कुठेतरी लिहून ठेवायला हवं. कारण नंतर बुद्धिवान माणसं या घटनेची चर्चा करतील तेव्हा त्यांना हा वासनेपोटी घडलेला प्रसंग वाटेल. पण मला वासना दिसत नव्हती. तो क्रोध होता. 


त्यांच्या आया बहिणींना असच उचलून नेत आलेले. गावाबाहेर घर, वेगळी भांडी, विलग काम विलग दाम.. अस्वच्छ.. अस्पृश्य.. दुर्लक्षित अन्याय, नोंदी नसलेले गुन्हे.. गुन्हा म्हणून मान्यताच नसलेले गुन्हे.. त्यांच्या विरुद्ध घडत राहिले.. या सगळ्याचा क्रोध.. आणि मी समजूनच घेऊ शकणार नाही अशा असंख्य वंचनांचा क्रोध...


मी त्यांना म्हणाले, मला एक मिनिट बोलू द्या मग काय करायचं ते करा. ते शांत राहिले. 

मी त्यांना म्हणाले,


"स्त्री आणि क्षुद्र असा आपला एकत्र उल्लेख त्या लोकांच्या ग्रंथात आहे. बाई आणि बाटली म्हणून ते मला नशेसोबत जोडतात. मी त्यांची संपत्ती आहे, अब्रू आहे आणि गुलाम सुद्धा आहे. आपण एक व्हायला पाहिजे. आपला शत्रू एक आहे. '


त्यातला एक म्हणाला, "आधी का आली नाहीस? आमची बाजू घेण्यासाठी आम्ही तुला उचलून आणण्याची वाट बघत होतीस ? साली हिप्पोक्रेट.."


मी खडबडून जागी झाले. 


1 टिप्पणी:

  1. अजून जाणिवेत येणे बाकी आहे नेणिवेत येणे तर खूपच लांबची गोष्ट आहे....

    उत्तर द्याहटवा